शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- पेन्शनचा प्रश्न,कंत्राटीकरण, खाजगी करण,कमी पटाच्या शाळा बंद धोरण,विषयशिक्षकांचा सरसकट वेतनश्रेणीचा प्रश्न,१०-२०-३० आश्वासित प्रगती योजना,शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न,आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न, बदलीसाठी जुनी सेवा ग्राह्य धरणे आदी प्रश्न प्राथमिक शिक्षक भारतीने सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन हे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे.शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेने नेहमी शिक्षण आणि शिक्षकांच्या हितासाठी लढा उभारला आहे.कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात राज्य कार्यकारिणी सातत्याने प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी केले.ते प्राथमिक शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा शाखेने श्री विश्वकर्मा सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे होते.प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पुंडलिक देशमुख, चंद्रपूर जिल्हा माध्यमिक अध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर शेरकी,महिला जिल्हाध्यक्षा निर्मला सोनवणे,राजेश घोडमारे,जब्बार शेख,विरेनकुमार खोब्रागडे,विजय मिटपल्लीवर,अमरदीप भुरले आदी उपस्थित होते.
शिक्षक भारतीने शिक्षकांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. विविध अन्यायकारक शासननिर्णय सरकारला मागे घ्यायला शिक्षक भारतीने भाग पाडले आहे.असे असताना संघटनेचे कार्य जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत पोहचवणे शिक्षक भारती सदस्यांचे कर्तव्य आहे.संघटनेचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांनी केले.याप्रसंगी विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, पुंडलिक देशमुख,निर्मला सोनवणे,विरेनकुमार खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षक भारतीचे सदस्य दिवाकर कुमरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मेळाव्याचे प्रास्ताविक नंदकिशोर शेरकी यांनी केले.संचालन विलास फलके यांनी केले. आभार केशव वाघमारे यांनी मानले.मेळाव्याला शिक्षक भारती पदाधिकारी तथा सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना