जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील माणिकनगर येथील गुरुदेव शारदा महिला मंडळाने ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाच्या सामुहिक वाचनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला.मागील १९ वर्षांपासून हे मंडळ विविध उपक्रम राबवित असते.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत मानून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाच्या ४१ महिलांद्वारे सामुहिक वाचनाच्या उपक्रमाचे आयोजन केले.ग्रामगीता घरोघरी वाचली जावी आणि तुकडोजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहचावे या उद्देशातून ग्रामगीता सामुहिक वाचनाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
ग्रामगीता सामुहिक वाचनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे नागपूर प्रांत सेवाधिकारी ग्रामगीताचार्य विठ्ठलराव सावरकर,चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी अशोक चरडे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे,शामराव राऊत,चिमूर तालुका ग्रामसेवाधिकारी नत्थू भोयर आदी उपस्थित होते.अशोक चरडे,सुरेश डांगे,विठ्ठलराव सावरकर यांनी याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.ग्रामगितेतील सर्व अध्याय समाजाच्या उन्नतीसाठी उपयुक्त असून समाजातील सर्व घटकांनी ग्रामगितीचे वाचन,मनन, चिंतन केले पाहिजे. कुटुंबात ग्रामगितेवर चर्चा केली पाहिजे.ग्रामगीता हा मानवाच्या उद्धानाचा मानबिंदू असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अशोक चरडे यांनी केले.विठ्ठलराव सावरकर, सुरेश डांगे यांनी तुकडोजी महाराजांच्या विचारांची विविध उदाहरणे याप्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे संचालन गुरुदेव सेवा मंडळ चिमूरचे सचिव परमानंद बोरकर यांनी केले. आभार ईश्वर कुबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा राऊत, प्रिया बोरकर, शुभांगी कुबडे, सुधाकर सिनगारे,राजेंद्र संगमवार,रत्नाकर विटाळे,केवळराम अतकरे,राजू मडावी,मोहन दोडके,भाग्यवान कंडे,प्रशांत ठावरी आदींनी सहकार्य केले.
ज्वाला समाचार सच का सामना