गंभीर जख्मी वाघ अखेर दगावला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात बेंबाळ शिवारात गुरुवारी सकाळी १०-०० वाजताच्या सुमारास म्हशींच्या कळपाने वाघाला झुंज देत जखमी केल्याची घटना घडली. जंगलाच्या राजाला म्हशींनी एकीच्या बळावर दिलेल्या थरारक झुंज परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. जखमी वाघाची सहा तासांनंतर मृत्यूशी झुंज संपली.

वाघ जखमी झाल्याची वार्ता सर्वत्र पसरताच नागरिकांनी वाघ बघण्याकरिता अतोनात गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता जखमी वाघावर उपचार करण्यापूर्वीच वाघ मृत असल्याचे वनविभागाला कळले. मुल तालुक्यातील येसगाव येथील गणेश भाऊजी सोनुले वय वर्ष ३५ हा गुराखी मनोरुग्ण असल्याकारणाने रात्री- बेरात्री फिरत असतो. गुरुवारी पहाटेच्या वेळी ४ वाजताच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन घराबाहेर गेला. भजाळी गावाजवळ गणेश येताच वाघाने गणेशवर हल्ला केला.

गणेशने तत्परता दाखवत हातातील कुऱ्हाड वाघावर उगारताच वाघ तेथुन पसार झाला. वाघाच्या हल्ल्यात गणेश जखमी झाला. हाच वाघ फिरत फिरत बेंबाळ शेतशिवारात आला असता जवळच असलेला म्हशींचा कळप त्याठिकाणी चरत होता. वाघाने कळपातील एका म्हशीवर हल्ला करताच कळपातील तीन म्हशी त्याच्यावर तुटून पडल्या. म्हशींच्या एकजुटीमुळे वाघाचा यावेळी टिकाव लागला नाही व वाघाला हार पत्करावी लागली. वाघ जखमी अवस्थेत एका बाजूला निपचित पडला.
ज्वाला समाचार सच का सामना